Posts

Showing posts from March, 2022

झेहन

 काल एक उर्दू शब्द ऐकला...  'झेहन' म्हणजे आठवणींची जागा !! आठवणी जिथे जमा करून ठेवल्या जातात ती मेंदूतील जागा !! ती नायिका आपल्या मुलीला सांगते की झेहन मध्ये फक्त चांगल्या आठवणींनाच  जागा दे. वाईट आठवणी मुद्दामहून आठवू नकोस.     किती सुंदर वाक्य आहे हे !!!! पण प्रत्यक्षात तसे होते कां? जाणीवपूर्वक की नकळत आपण नकारात्मकच विचार करतो. वाईट गोष्टीच आठवतो.  हे असे का होते,ते टाळता येईल कां? हो, नक्कीच!! पण कसे?? कारण सहसा वाईट आठवणीच लक्षात राहतात.      आपण एखाद्या सुंदरशा सहलीला जाऊन आलो आहोत. तिथली सुंदरता, बाग-बगिचे, केलेली मजा सांगण्याअगोदर ,आपण घोड्यावर चढताना घसरलेल्या पायाची आठवण प्रथम सांगतो.     किंवा एखाद्या छानशा लग्नसमारंभ/कौतुक समारंभा ला जाऊन आल्यावर तेथे जाणवलेल्या त्रुटीच दुसऱ्यांना सांगत बसतो. तो कार्यक्रम कितीही दृष्ट लागण्यासारखा झालेला असो (आपलीच दृष्ट त्याला लागते) वाईट-साईट आठवणीच काढल्या जातात.     नातेसंबंधातही तेच, कुणी कितीही चांगले वागलेले असो, मदत केलेली असो.... आठवतात फक्त कटू आठवणी!!!! झेहन मध्ये दुर्दैवाने तेच लक्षात राहिलेले असते.     कितीही चुकीचे, न

घर

 TLC Channel वर Extreme homes नावाचा एक प्रोग्रॅम लागतो. खूप सुंदर सुंदर घरे दाखवतात, मुद्दाम बांधलेली !! सगळीच खूप मोठी, एखादी थीम घेवून,स्वप्नात असावीत अशी !!       अर्थात श्रीमंताचेच काम आहे हे तरीही काही खूप कलात्मक,  नजाकतदार तर काही मात्र अंगावर येणारी, पैसा आहे तर कसाही वापरा अशी बांधलेली...       पण एकंदर प्रोग्रॅम छान असतो. छान, सुरेख, मोठ्ठाली घरे बघावीत तरी , छान, प्रसन्न वाटते मनाला ! राहायचेय थोडेच त्यात, बघायला काय जातेय!!!!!      'घर' कसे असावे, याचे उत्तर विमल लिमये यांनी त्यांच्या 'घर असावे घरासारखे' या सुंदर कवितेत दिले आहे.       घरांचेही देवळांसारखे असते. काही चकचकीत देवळे असतात, तेथे गेल्यावर छान, प्रसन्न वातावरण असते ते आवडते. पण घुमटाकार, दगडी देवळात, मन:शांती,समाधान, एक वेगळेच गंभीर अस्तित्व जाणवते,जे मनाला प्रसन्न तृप्ती देऊन जाते.      घरांचेही तसेच असते. काही घरे प्रेमाने बोलावतात. आत गेल्यावर एक वेगळाच आपलेपणा जाणवतो. कुठेही,कसेही बसा ते प्रेमानेच बघते. काही घरांमध्ये मात्र एक अनोखे दडपण जाणवते. कुठे,कसे बसावे इथपासून कुठे हात तर लागणार नाही

कृतज्ञता

     काय निसर्गाचा चमत्कार आहे पहा !! ' कालनिर्णय ' ने सांगितले वसंतोत्सवाची सुरुवात होतेय , आणि , इकडे समोरचा पुर्णपणे सुकलेला गुलमोहर झाला की हो हिरवा जर्द आणि पुढच्या महिन्यात होईल पिवळाधम्मक !!!   कमाल आहे की नाही , निसर्ग नेहमीच आपल्याला चमत्कार दाखवत असतो , त्यातील आपण किती पाहतो ही गोष्ट अलाहिदा !!!    मानवी मना/शरीराचेही तसेच आहे , what's app मेसेजेस मुळे याचे महत्त्व आतापर्यंत सगळ्यांच्याच लक्षात आले असेलच कि किती नियोजन पूर्ण सर्व चालते , जणू काही मशीनच , इ.इ...... असो.    आपल्याला आयुष्यात अनेक माणसे भेटतात. आवडती , नावडती , नाइलाजास्तव बांधलेली , मनापासून हवीहवीशी आणि अनेक !! काहीजणांना दूर करताच येत नाही , तर काही जाणीवपूर्वक आयुष्यात आलेली आणि काही प्रियजनांहून ही प्रिय अशी.... मित्रमंडळी !!!!     असे अनेक प्रकार.... पण आपण सहसा या संदर्भातील वाईट वागणूकच लक्षात ठेवतो , चांगल्या गोष्टी विसरूनच जातो.     कुणाचे आपल्यावर खूप उपकार (जे आपण सहजच विसरून जातो) , तर कुणावर आपण केलेले (जे आपण कधीच विसरत नाही) , तर काही माणसे अबोलतेने आपल्याला साथ करत असतात

OTT मायाजाल

      आमचे एक ओरिसाचे मित्रवर्य एकदा म्हणाले , मराठी व बंगालीला खूपच मोठी सामाजिक , सांस्कृतिक पार्श्‍वभूमी आहे पण सिनेमाबद्दल म्हणाल तर दोन्हीकडे दु:खच विकतात... दु:ख तर काय जीवनाचे एक अविभाज्य अंगच आहे , ते कुणाला टळलेय ??? पण सिनेमात तरी इंटरटेनमेंट दाखवा की ! तीन तास तरी जरा स्वप्नात जगा !!! हे बरेचसे पटलेच. मग मनापासून वाटले की कशाला विकतचे दु:ख घ्या.     मुळात इंग्लिश सिनेमांची आवड होतीच. Schindler’s List, Sound of Music पासून Avengers चा परत परत आनंद घेवून नवनवीन उत्तम जागा शोधण्यात मजा येत असे.        OTT platform पासून मात्र थोडी दूरच होते , ते ' मायाजाल ' वाटत असे. पण एकदा मात्र मुलीच्या आग्रहाखातर या मोहजालात गुरफटले आणि त्या आनंदसागरात पुन्हा पुन्हा डुंबत राहिले. अलीबाबाची गुहा की पद्मनाभ मंदिराचा सातवा दरवाजाच उघडला.    सुरवात झाली फॅमिली मॅन पासून. एवढी उच्च दर्जेदार कलाकृतीने पुढे पुढे पाहण्यास बांधून ठेवले. तिसरा भाग लवकरच येत आहे म्हणे , ही आनंदाची बातमी !!     ' असुर ' ही  Hollywood ला टक्कर देणारी! सरसरून काटा आणणारी पण मनाच्या एका काळ्या  

अलक: (अती लघुकथा)

१.  काकू: सकाळ उजाडली , काकू गेल्याच्या बातमीने अख्खे गाव गोळा झाले. शेवटच्या आंघोळी साठी मुलाने कळशी वरचे झाकण काढले मात्र , काकू काय झाले करत उठून बसल्या. रात्री कळशी उघडी दिसली म्हणून मुलानेच झाकण ठेवले होते आणि पाणी प्यायला गेलेला काकूंचा आत्मा त्यात अडकला होता.   २. राजकन्या: तलावाच्या काठावर बसलेला हिरवा जर्द बेडूक , राजकन्ये ला येताना पाहून खुशीत हसला , आता प्रेमाच्या एका चुंबनाचीच प्रतिक्षा होती. ती आली , तिने अलगद त्याला उचलून घरी नेले. आणि दासीच्या हातात देऊन म्हणाली , याच्या मांड्यां ची मस्त भाजी कर.   ३. कुतुबमिनार: समीर आणि त्याच्या मित्रांनी रात्रीच्या अंधारात गुपचुप खूप काळजीपूर्वक कुतुबमिनार वाटोळे बॉ म्ब पेरले. सकाळीच अपेक्षित परिणाम दिसून आला. श्री विष्णुदेव अलगद जमीनीवर पहुडले होते आणि नाभीतून बाहेर आलेला कुतुबमिनार कमल दिठीसारखा डौलात डुलत होता.   वीणा कुलकर्णी 🙏