लोलक
देवाच्या देवळातून चोरून आणलेला लोलक
हरवला माझ्या हातून,
तेव्हा डोळ्यातली फुलपाखरे उडून गेली
आणि विझली पाण्याच्या थेंबातली इंद्रफुले,
आता गवत नुसतेच हिरवे दिसते,
आभाळ नुसतेच निळे,
घराघरांना, माणसांना फुटतच नाहीत इंद्रधनुष्याचा रेषा.
एकदा एक पोर आली उड्या मारीत
हातांचे पंख पसरून, डोळे विस्फारून
खिदळत मला म्हणाली,
‘ गमत बघ, गवत हिरवे नसते,
आभाळ निळे नसते,
आणि माणसे असतात इंद्रधनुष्याची बनवलेली,
माहीत आहे तुला?’
माझा लोलक हिला कुठे सापडला?
देवळातल्या झुंबराला किती लोलक आहेत अजून?
- शांता शेळके
लोलक ही शांताबाई शेळके याची कविता एकदा सलील कुलकर्णी यांनी झी मराठी वरील एका गाण्याच्या कार्यक्रमात म्हणून दाखवली होती. व सांगितले की तुमचा लोलक कोणत्याही परिस्थितीत हरवू देवू नका वगैरे वगैरे !!!!
पण आपल्या आयुष्यात नेहमीच सुख असते का की आकाशही रंगीत दिसावे ?? कधीकधी तर कठीण प्रसंग येतात तेव्हा तर आपण विसरूनच जातो की आपल्याकडे लोलक आहे.
मग कसे बरे लोलक सांभाळून ठेवायचा ? तर प्रयत्न तर आपल्या हातात आहेत की लोलक हरवू न देणे !!
छोट्या छोट्या गोष्टीतही आनंद शोधत राहिलो तर लोलक हरवणार नाही आणि पुनः एकदा सगळे रंगीत होईल हा विश्वास बाळगायचा. कारण शेवटी ,
'उम्मीद पे दुनिया कायम है !!!!'
वीणा कुलकर्णी 🙏🙏
प्रसंगातील जे श्रेयस ते घ्यायचं, प्रेयसही घेतलं तरी चालेल पण तारतम्याने, मग अगदी प्रत्येक ठिकाणी रंग मिळतील, संगीताचे सुरेल स्वर कानी पडतील, आपआपला लोलक सांभाळला जाईल....
ReplyDeleteछान 🙏🙏🙏
ReplyDelete