श्रवणभक्ती

     ऐकणे ही एक कला आहे. सर्वसाधारणपणे सगळ्यांना बोलायला आवडते. ऐकायला नाही.

     खरतर देवाने आपल्याला एक तोंड व दोन कान दिले आहेत. कारण जेवढे बोलतो त्याच्या दुप्पट ऐकण्यासाठी !!!! 

       पण आपण काय करतो समोरच्याचे बोलणे आपण फक्त प्रत्युत्तर देण्यासाठीच ऐकत असतो. ऐकता ऐकता ही काय बोलायचे हा विचार करतच ऐकत असतो.

       खरतर कधीकधी समोरच्याला उत्तर, सांत्वन, दिलासा असे काहीच नको असते. फक्त त्याला आपले मन हलके, मोकळे करायचे असते. त्याचे बोलणे, मनातली खदखद कुणीतरी फक्त ऐकून घ्यावी एवढेच त्याला वाटत असते.पण होते काय ऐकणारा एक तर नीट ऐकतच नाही अथवा उपदेशाचे डोस देतो अथवा स्वतः विषयीच बोलू लागतो.

       खूप कमी लोक भेटतात जी मनापासून समोरच्याचे ऐकून घेतात, कसलाही सल्ला न देता !!!!

       सुखाचे क्षण सर्वांसोबत वाटता येतात पण दुःख मात्र आपण आपल्या जिवलगांशीच बोलतो. त्यावेळेस उपदेशाचे डोस, सल्ले, पैसा,मदत या कशाचीच अपेक्षा नसते. ती गरज ओघाने येणार असतेच पण त्याक्षणी कुणीतरी आपले बोलणे फक्त ऐकत आहे एवढेच हवे असते. आपले बोलणे कुणीतरी ऐकावे एवढीच अपेक्षा असते.

       मला वाटते आपण शाळा, कॉलेजात ही शिक्षकांचे ऐकले ते फक्त मार्क्स मिळवण्यासाठीच !! त्यामुळेच त्या ज्ञानाचा व्यवहारात किती उपयोग करतो हा प्रश्न उरतोच. 

      आईवडील, मोठ्यांचे बोलणे उपदेशामृतच वाटते. त्यासाठी मात्र दोन्ही कानांचा उपयोग करतो. एका कानाने ऐकून, दुसऱ्या कानाने सोडून देण्यासाठी !!! 

       असो. मजेची गोष्ट जाऊ देत.

तुम्ही कोणत्या प्रकारात मोडता ??

ऐकणारा की ऐकवणारा ?? श्रवणभक्ती करू शकता का तुम्ही ?? ती भक्ती नव्हे तर शक्ती म्हणून वापरून पाहूया का, समोरच्याला दिलासा देणारी शक्ती म्हणून  ??? स्वतःचे बोलके घोडे पुढे न दामटता ??

      राॅबिन शर्मा म्हणतात, कमी बोला आणि जास्त करून दाखवा. कारण लोक तुम्ही काय बोलता या पेक्षा काय करता ते बघतात.



  वीणा कुलकर्णी  🙏🙏

Comments

  1. वसंत फडकेOctober 1, 2023 at 11:01 AM

    अगदी खरं ......

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अभंगाचा गाथा १३

झिम्मा

अभंगाचा गाथा १२