अभंगाचा गाथा १३
देवाच्या प्रसादें करा रे भोजन । व्हाल कोण कोण अधिकारी ते ॥ ब्रम्हादिकांसि हें दुर्लभ उच्छिष्ट । नका मानूं वीट ब्रम्हरसीं ॥ अवघियां पुरतें वोसंडलें पात्र । अधिकार सर्वत्र आहे येथें ॥ इच्छादानी येथें वळला समर्थ । अवघेंचि आर्त पुरवितो ॥ सरे येथें ऐसें नाहीं कदाकाळीं । पुढती वाटे कवळीं घ्यावें ऐसें ॥ तुका म्हणे पाक लक्षुमीच्या हातें । कामारीसांगातें निरुपम ॥ देवाच्या प्रसादाचे ग्रहण कराल तर तुम्ही नक्कीच अधिकारी व्हाल. संतांच्या उष्टयाचे सेवन करा,त्याला कमी लेखू नका. त्याचे सेवन करण्याचा अधिकार सर्वांना आहे. इथे सर्वांची इच्छा पुरविणारा विठ्ठल आहे. या प्रसादाचा आनंद चिरकाल टिकणारा आहे. त्याचे सेवन करण्याची इच्छा वारंवार होते. तुकाराम महाराज म्हणतात, हे भोजन प्रत्यक्ष लक्ष्मी तयार करते , तिच्याच हातून या भोजनाचा लाभ व्हावा. 🙏 बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय ॥ वीणा कुलकर्णी 🙏🙏