अभंगाचा गाथा १०

         सुखे वोळंब दावी गोहा । माझें दुःख नेणा पाहा ॥ आवडीचा मारिला वेडा । होय कैसा म्हणे भिडा ॥ अखंड मज पोटाची व्यथा । दुधभात साकर तूप पथ्या ॥ दो पाहरा मज लहरी येती । शुद्ध नाहीं पडे सुपती ॥ नीज नये घाली फुलें । जवळीं न साहती मुलें ॥ अंगी चंदन लावितें भाळीं । सदा शूळ माझे कपाळीं ॥ निपट मज न चले अन्न । पायली गहूं सांजा तीन ॥ गेले वारीं तुम्हीं आणिली साकर । साता दिवस गेली साडेदहा शेर ॥ हाड गळोनि आलें मास । माझें दुःख तुम्हां नेणवे कैसें ॥ तुका म्हणे जिता गाढव केला । मेलियावरी नरका नेला ॥

 

        सुखी असलेली एक बाई आपल्या नवर्‍याला म्हणते, मी सुखी नाही. मी दुःखी आहे. तिच्या आवडीने वेडा झालेला तिचा पती तिच्या प्रत्येक गोष्टीला होकार देतो. ती नवर्‍याला म्हणते मला अखंड पोटाची व्यथा आहे,त्याला पथ्य म्हणून दुधभात, साखर, तूप घालून खावा लागेल. मला दुसर्‍या प्रहराला चक्कर येते व शुद्ध रहात नाही त्यामुळे माझ्या खाली फुले टाकल्यावरच मला झोप येते. त्यात ही आपली मुले जो त्रास देतात तो मला सहन होत नाही. पुढे ती म्हणते, मला सतत डोकेदुखी होते मग मला अंगाला व कपाळाला चंदन लावावे लागते. गेल्या आठवडय़ात तुम्ही साडेदहा शेर साखर आणली ती सातच दिवसात संपली. माझी हाडे बारीक होऊन माझे मांस वाढले, हे माझे दुःख आहे हे तुम्हाला कळत कसे नाही ? 


       तुकाराम महाराज म्हणतात,  अश्या प्रकारे त्या माणसाचा जिवंतपणे गाढव केला आणि मेल्यावर तो नरकात गेला. 


बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल,  

श्री ज्ञानदेव तुकाराम,  पंढरीनाथ महाराज की जय ॥ 


वीणा कुलकर्णी  🙏🙏

Comments

Popular posts from this blog

अलीबाबाची गुहा..

इंटरनेट उपवास

लापता लेडीज: माणुसकीचे दर्शन