लापता लेडीज: माणुसकीचे दर्शन
लापता लेडीज पुनः एकदा बघितला,समजून उमजून!!!
इराणी सिनेमाची काॅपी आहे,इ.इ. सगळ्यांनाच स्टोरी माहीत असूनही एक सांगावेसे वाटते की सिनेमा खूपच छान आहे....खरा, माणुसकीचे दर्शन घडवणारा.
या सिनेमातील मुली खूप शिकल्या सवरलेल्या नाहीत, वयाने, अनुभवानेही अबोध आहेत पण त्या 'खऱ्या ' आहेत. स्वत्व जपून आहेत.
असो.... तर महत्वाचे काय तर या सिनेमाने खरी स्त्रीशक्ती दाखवली आहे.
एकदम छोटीशी गोष्ट, चुकून सून म्हणून आलेली मुलगी त्या सासूला स्वत:ला आवडणारी भाजी करायला लावते. खरंतर किती जणी आपली स्वत:ची आवड जपतात?? त्यामुळेच तो प्रसंग गोड वाटतो.
तीच चुकून आलेली मुलगी मग शेतीत मदत करते, त्या नवर्याचे दुःख बघून, पळून न जाता, वहिनीतील चित्रकलेतील आवड ओळखून चित्र काढून घेते. ते xerox काढून circulate करविते...
ही इकडे अशी धडपड करत असते तर हरवलेली मुलगीही नवरा शोधत आला की आपल्याला ओळखावे म्हणून साडी ही न बदलता, स्वतःच्या पायावर आशेने उभी रहाण्याचा प्रयत्न करत असते आणि नवरा येणारच या जिद्दीवर ठाम असते. आणि तिचा नवरा तेवढाच भोळा भाबडा असून खूप प्रामाणिक दाखवलाय. चुकून आलेल्या मुलीचा खूप आदर ठेवतो आणि तिला न्याय मिळवून देतो.
किती कोवळ्या या मुली पण खूप प्रगल्भ वाटल्या.
खरंतर माणुसकीला धरून वागणाऱ्यांचे चित्रण हेच या सिनेमाचे यश आहे. आणि तेच मनाला भावते.
पोलीस ऑफीसर, ट्रेनस्टेशन वरची माणसे, शेतीत मदत घेणारा सासरा, xerox machine वाला...किती नावे घ्यावीत...सगळेच माणुसकीला धरून 🙏🙏
या सगळ्यांनी केलेली मदत बघून ऊर भरून येतो.
प्रत्यक्षात खरी माणसे अशीच असतात, चांगली !!! अशीच होती!!
पण आजूबाजूचे वातावरण, मिडीया वरचे बिभत्स चित्रण माणसांना भरकटवत आहे. त्यापासून स्वतःला वाचवणे एवढेच आपल्या हातात आहे.
वीणा कुलकर्णी 🙏🙏
Comments
Post a Comment