कौतुक
"जातस्य हि ध्रुवो मृत्यु:" ( भगवद्गतगीता २.२७)
हे त्रिकालाबाधित सत्य सर्वांनाच माहित आहे. जन्माला आलेला प्रत्येक जीव नक्कीच मृत्यू पावणार आहे.
हे माहित असूनही बहुतांश लोक, (माझ्यासहित), मी,माझे च करत असतात. राग,लोभ सारख्या षड्रिपूं मध्येच अडकून राहिलेले असतात.
स्वत: पलिकडे माणसाला खरचं काही दिसत नाही कां ??
कधीतरी समोरच्याचे मनापासून कौतुक करणे, कृतज्ञता व्यक्त करणे हे फार कमी वेळेला होताना दिसते.
पल्लवी जोशी निवेदन करत होती तो सारेगमप कार्यक्रम आठवतोय ? किती ती छान बोलत असायची !!! सगळ्यांचे कौतुक तिच्या शब्दाशब्दातून अगदी ओसंडून वाहत असायचे. भले ते लिहून दिलेले असेल पण किती ते खरे आणि छान वाटायचे. लेखकाचेही कौतुक!!!!!
एकंदरीतच आपण भारतीय माणसे भावना व्यक्त करणे कमजोरपणाचेच लक्षण मानतो असे मला वाटते. असो...
तसे तर नाट्यगृहात ही ते वेगळ्याच प्रमाणात दिसते. पुढच्या रांगांमधील प्रेक्षक माफक प्रतिक्रिया देत असतात. तर शिट्या आणि टाळ्यांचा कडकडाट मात्र मागील रांगांमधूनच होत असतो. अर्थात आता परिस्थिती बदलली असेल तर कल्पना नाही.
खूपच दिवसांनंतर एक छान अनुभव मिळाला. आमच्या दहावीच्या बॅचचे दहावी होउन पन्नास वर्ष झाली म्हणून गेटटुगेदर होते. तेथे मात्र सुखद अनुभव आला. सगळेच्या सगळेच एकमेकांशी खूपच सुंदर पध्दतीने वागत होते. एकमेकांचे कौतुक करत होते. त्यामुळे ती एक अविस्मरणीय आठवण झाली आहे.
नाहीतर स्वत:तच गुंतलेल्या माणसांचाच अनुभव जास्त येतो. स्वत: पलीकडे काहीच न दिसणारेच जास्त!!!
असो...असे अनुभव तर येणारच पण स्वत:ला बदलायला काय हरकत आहे....समोरच्याचे मनापासून कौतुक करूयात, कृतज्ञता व्यक्त करूयात आणि समाधानाने भरून पावूयात.
वीणा कुलकर्णी 🙏🙏
अगदी खरं .....
ReplyDelete👍👍