घर

 TLC Channel वर Extreme homes नावाचा एक प्रोग्रॅम लागतो. खूप सुंदर सुंदर घरे दाखवतात, मुद्दाम बांधलेली !!

सगळीच खूप मोठी, एखादी थीम घेवून,स्वप्नात असावीत अशी !!

      अर्थात श्रीमंताचेच काम आहे हे तरीही काही खूप कलात्मक,  नजाकतदार तर काही मात्र अंगावर येणारी, पैसा आहे तर कसाही वापरा अशी बांधलेली...

      पण एकंदर प्रोग्रॅम छान असतो. छान, सुरेख, मोठ्ठाली घरे बघावीत तरी , छान, प्रसन्न वाटते मनाला ! राहायचेय थोडेच त्यात, बघायला काय जातेय!!!!!

     'घर' कसे असावे, याचे उत्तर विमल लिमये यांनी त्यांच्या 'घर असावे घरासारखे' या सुंदर कवितेत दिले आहे.

      घरांचेही देवळांसारखे असते. काही चकचकीत देवळे असतात, तेथे गेल्यावर छान, प्रसन्न वातावरण असते ते आवडते. पण घुमटाकार, दगडी देवळात, मन:शांती,समाधान, एक वेगळेच गंभीर अस्तित्व जाणवते,जे मनाला प्रसन्न तृप्ती देऊन जाते.

     घरांचेही तसेच असते. काही घरे प्रेमाने बोलावतात. आत गेल्यावर एक वेगळाच आपलेपणा जाणवतो. कुठेही,कसेही बसा ते प्रेमानेच बघते. काही घरांमध्ये मात्र एक अनोखे दडपण जाणवते. कुठे,कसे बसावे इथपासून कुठे हात तर लागणार नाही नां, किमती वस्तूंना धक्का तर लागणार नाही नां, या गोंधळात कुठून इथे आलो असे होते !!!!!

    पूर्वीची कौलारू घरे बरीचशी 'प्रेमळ व ऐसपैस' होती. पण त्यातही काही वाडे, घरे भयाण दडपण देत असत.

    खरेतर घरांना व्यक्तिमत्व मिळते ते त्या घरातील माणसांमुळे, त्यांच्या स्वभावामुळेच!! मग ती घरे लहान असोत वा मोठी.

     एकदा माझ्या मैत्रीणीची मुलगी रेल्वेतून ट्रॅकवर पडली. विशेष लागले नाही पण जवळच असलेल्या झोपडीवजा घरांमधून लगेचच माणसे धावत आली,तिला घरी नेऊन पाणी वगैरे दिले. त्यावेळेस तिला ते घर मंदिराहूनही महान वाटले होते.

    प्रत्येक घरात एक वास्तूदेवता असते, ती सतत 'तथास्तु' म्हणत असते, असे आमची आजी सांगत असे. ती म्हणे, घरात अभद्र बोलू नका, चांगलेच वागा- बोला- विचार करा !!! 

      कित्ती सुंदर अर्थपूर्ण संस्कार आहेत हे, वास्तुदेवते च्या भितीने का होईना, घर शांत, समाधानी राहणार असेल तर ते कुणाला नको असते ?? 

     'तथास्तु....तथास्तु '

      !! वास्तुदेवताय नम: !!!! 🙏

Comments

  1. Vasant Govind PhadkeMarch 20, 2022 at 7:15 PM

    घर घरासारखंच हवं .....
    छान व्यक्त केलंयस ....

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अभंगाचा गाथा ११

अभंगाचा गाथा १२

अभंगाचा गाथा १०