कलीयुगाची पूर्वसूचना
सध्या सगळीकडेच युध्दाच्या बातम्या ऐकू येत आहेत.त्या संदर्भात एक गोष्ट आठवली.
महाभारत युध्द समाप्ती नंतर कलीयुगाची सुरवात होणार असते. कली लोकांच्या डोक्यात शिरून विध्वंसाची सुरुवात करणार असतो. त्या पार्श्वभूमीवर पांडवानी भगवान श्रीकृष्णांना विचारले कलीयुगात कशी परिस्थिती असेल यावर भगवानानी चार दिशांना चार बाण फेकले व ते त्यांना आणावयास सांगितले.
अर्जुन ज्या दिशेला पोचला तेथे जे दृश्य दिसले त्याने तो थक्क झाला. एक मैना मंजुळ आवाजात गात होती. पण गाता गाता ती एका जिवंत सशाचे लचके तोडून खात होती.
भीमाने ही आपल्या दिशेला पोचल्यावर जे पाहिले ते ही थक्क करणारे होते. चार पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरींच्या मध्ये एक विहीर होती,ती मात्र कोरडी ठाक होती.
नकुलाला असे दिसले की, एक गाय आपल्या नुकत्याच जन्म दिलेल्या वासराला चाटत होती पण तीने त्याला इतके चाटले की त्याची कातडी सोलवटली. शेवटी लोकांनी त्याला तिच्यापासून दूर केले.
सहदेवाला एक मोठा दगड डोंगरावरून गडगडत येताना दिसला. तो वाटेत येणारी झाडे- झुडुपे उध्वस्त करतच येत होता. शेवटी मात्र एका छोट्याशा रोपटयापाशी येऊन ती अडला.
अचंबित झालेले चारही भाऊ भगवानांपाशी आले आणि त्यांना दिसलेल्या अद्भुत गोष्टी कथन करून त्या गोष्टींचा अर्थ विचारू लागले.
भगवान श्रीकृष्ण म्हणाले ह्या कलीयुगात घडणाऱ्या खऱ्या गोष्टी असतील !!!!!
अर्जुनाने बघितलेली मैना ही कलीयुगातील स्वतःला संत-महात्मे म्हणवून घेणाऱ्या ढोंगी लोकांचे प्रतीक आहे. ते बोलतील गोड पण त्यांच्या साधकांचे शोषण करतील.
भीमाने बघितलेल्या विहीरी या सामाजिक असंतुलनाचे प्रतीक असेल. भरून वाहणाऱ्या विहीरीं प्रमाणे श्रीमंतांकडे अतिरेकी पैसा,समृद्धी असेल. मात्र मधल्या विहीरी प्रमाणे गरीब अन्न पाण्यावाचून तडफडतील.
नकुलाने पाहिलेली गाय ही कलीयुगातील पालकांचे प्रतीक आहे. ते आपल्या पाल्यांना इतके काही देतील की शेवटी ते निष्क्रीय होण्याच्या मार्गावर जातील.
सहदेवाने पाहिलेले रोपटे हे तुमचे, माझ्या खऱ्या अनुयायांचे आहे. जे आयुष्यात कितीही संकटे येवोत, माझ्यावरच्या दृढ विश्वासाने, निस्सीम भक्तीने त्यातून अलगद तरून जातील. म्हणून कलीयुगात माझे नामस्मरण करणे हे सगळ्या प्रश्नांवर उत्तर असेल.
रामकृष्ण हरी 🙏🙏
वीणा कुलकर्णी 🙏🙏
🙏🙏
ReplyDelete