संभव-असंभव
श्रीमद्भगवतगीता अध्याय २ श्लोक २३:
नैनं छिन्दन्ति शस्राणि, नैनं दहति पावकः |
न चैनं क्लेदयन्त्यापो, न शोषयति मारूतः ||
हा श्लोक सर्वांनाच माहित आहे. आत्मा अमर आहे,तो पुनः पुनः शरीर बदलत असतो,त्याला मरण नाही.
हे अबाधित सत्य असले तरी आपले जीवन मात्र क्षणभंगुर, नश्वर आहे. आपण आज आहोत तर उद्याची शाश्वती नाही हे त्रिकालाबाधित सत्य मनुष्य जन्माला येतो तेव्हाच ठरलेले असते. तरीही आपण राग-लोभ, हेवेदावे,तुझे,माझे करण्यात आणि जीवनाच्या आसक्तीतच अडकून पडलेले असतो. माझा उद्या नक्कीच उजाडेल हे किती सहजपणे आपण गृहीत धरून चालत असतो !!!
साधारण २००७ - २००९ मध्ये झी वाहिनीवर "असंभव" नावाची एक अद्भुत मालिका लागत असे त्याची आठवण आली. तशी ती आत्ताही युट्यूब वर उपलब्ध आहेच. त्याचे शीर्षकगीत असे होते -
दिवसामागूनी रात्र धावते, सकाळ संध्याकाळ,
सूत्रधार या साऱ्या चा नाव तयाचे काय ?
काय तयाच्या मनात दडले, न कळे कधी,कुणा
क्षणात होते संभव सारे, क्षणापूर्वीचे असंभव!!
खरंच कोण आहे तो सूत्रधार, जो हा जगाचा पसारा निर्विकारपणे चालवत आहे. किती कठीण काम आहे हे दुनियेचे रहाटगाडगे सुरळीतपणे ओढण्याचे..
आपल्या शरीराची अद्भुत रचना तर नेहमीच अचंबित करते पण राहून राहून एका गोष्टीचे नवल मला कायमच वाटत असते,ते म्हणजे , जगात एवढी लाखो-करोडो माणसे आहेत पण प्रत्येकाच्या बोटांचे ठसे मात्र वेगळे ! खरतर किती सुक्ष्म रचना आहे ती.. तेच डोळ्यांच्या बाहुल्यांचे, एकासारखे दुसर्याचे डोळे नसणारच..
कशी जमवतो ही किमया तो जगन्नीयंता?? खरोखर खूपच अद्भुत आहे हे सगळेच.
पण सर्वसामान्यपणे माणसे मात्र मी, माझे, माझी सुख-दुःख यांनाच कवटाळून बसतात.
पण वरील विचार, ब्रम्हांडाचा अफाट पसारा आपल्याला खुजे बनवून टाकतो आणि मन आदरपूर्वक त्या जगन्नीयंता पुढे नतमस्तक होते. 🙏
वीणा कुलकर्णी 🙏🙏
अगदी खरं, नतमस्तक त्या नियंत्यापुढे .....
ReplyDelete🙏
ReplyDeleteशक्ती कोणतीही असो ,तिचा महिमा अगाध आहे हे मात्र खरे आहे ,त्या शक्तीचा शास्त्रज्ञ अभ्यास करायला लागले तर त्यांचेही डोके गरगरायला लागेल
ReplyDeleteआपण सामान्य माणसे,आपल्या तर डोक्यापलिकडचेच आहे,🙏🙏