केरोफोबिया
मध्येच कुठेतरी केरोफोबिया बद्दल वाचनात आले. म्हणून गुगल करून बघितले तर गुगलने सांगितले की :-
केरोफोबिया म्हणजे आनंदाची भिती म्हणजेच आनंदी होण्याविषयी किंवा आनंद व्यक्त करण्याविषयी वाटणारी भिती.
त्याची सामान्य लक्षणे अशी की, मजेपासून दूर राहणे, वाईट नशीबाच्या परिणामांची काळजी करणे, आनंदासाठी दोषी धरणे, इ.
खरंतर इतक्या वाईट पध्दतीने नाही पण थोड्याफार प्रमाणात मी सुध्दा या केरोफोबियाला तोंड दिले आहे.
माझ्या मिस्टरांच्या निधनानंतर काही वर्षांनी आयुष्यात सलग दोन तीन वर्ष वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागले. त्या समस्या सोडविण्याच्या नादात सामाजिक आयुष्याकडे दुर्लक्ष झाले. आनंदाची भिती वाटू लागले. जोरात हसले तर वाईट नशीबाला तोंड तर द्यावे लागणार नाही नां अशा अनेक वेडगळ कल्पनांनी डोक्यात घर केले होते.
हळूहळू प्राॅब्लेम कमी होत गेले तसतसे डोक्यातील वाईट विचारांचे धुके ही वितळत गेले.
यावर उपाय ही आपोआप सुचत गेले. आवडीच्याच लोकांत मिसळणे, आवडीच्या गोष्टी करणे जसे हे मोरपंख सदर, रविवारी मी हे सदर पब्लिश करते मग दोन तीन दिवस ज्या विषयावर लिहीणार असते त्यावर वाचन करणे,विचार करणे असा छान वेळ जातो.
पासष्ट वर्षं आयुष्यातील पस्तीस-छत्तीस वर्षं तर संसार आणि नोकरीची कसरत करण्यात आणि मुख्य म्हणजे लोकांची मने सांभाळण्यात गेली त्यामुळे शक्यतो आता जिथे आपल्याला मानसिक त्रास होतो अशा जागा, माणसे अशांना गोड बोलून दूर ठेवणे हा उत्तम मार्ग आहे.
बाकी आपले वाॅट्स ॲप, फेसबुक आहेतच की वेळ छान जायला!! आमचे एक राजेश नावाचे मित्र रोज एक छान सकारात्मक मेसेज देतात, तो वाचून दिवसाची छान सुरुवात करायची.
तसे तर हा लेख लिहीतानाही खोल मनाच्या तळाशी अनामिक हुरहुर वाटत होती तरी जिद्दीने लेख पूर्ण केलाच!! शेवटी काय आपले प्राॅब्लेम आपणच सोडवायचे असतात, आणि वाट कशाला बघायची...शोधा म्हणजे सापडेलच की, हो मी सुखाविषयीच बोलतेय...
रामकृष्ण हरी 🙏
वीणा कुलकर्णी.
"शोधा म्हणजे सापडेल" अगदी खरं,
ReplyDelete