मदत
काल वाॅटस् ॲप वर एक गोष्ट वाचनात आली. एक महिला आजारी असते. ती एकदा अचानकपणे तिच्या वर्गमित्राला भेटते. आता शाळा सोडून जवळपास पन्नास वर्षं उलटून गेलेली असतात. तरीही तो आधुनिक सोशल मिडीयाच्या मदतीने वर्गातील जमतील तेवढ्या मित्र मैत्रीणींचा गृप बनवतो. त्या आजारी मैत्रीणीच्या नकळत,ती दुखावली जाणार नाही अशा पध्दतीने,तिच्या नवर्याच्याच मदतीने जवळच एक गेटटुगेदर ठरवतात.
ती सर्वांना भेटते. खूप खुश होते. मित्र मैत्रीणींची मनापासून केलेली मेहनत कामी येते. नंतर जमेल तशी मदत सगळेजण तिला करू लागतात. नवर्याच्या उत्तम सांपत्तिक स्थिती मुळे तसा पैशाचा प्रश्न नसतो. हवी असते ती शारीरिक आणि मुख्य म्हणजे मानसिक साथ !! ती मिळाल्यामुळे हळूहळू तिची तब्येत बर्यापैकी सुधारू लागते.
ही गोष्ट वाॅट्स ॲप वर आलेली... किती खरी,किती खोटी माहित नाही. पण संकल्पना खूप आवडली.
सलील कुलकर्णी यांचा एक लेख वाचनात आला होता. पुण्यात खूपसे पालक एकटे राहतात. कारण मुले परदेशी अथवा नोकरी निमित्ताने बाहेरगावी असतात म्हणून. मग पुण्यात अशी एक संस्था आहे जी अशा वृध्दांना बॅंकेत, दवाखान्यात वगैरे घेवून जाण्याकरता मदत करते, वगैरे,वगैरे .
अशा कल्पना किती सुंदर आहेत. पण अशा कल्पना फक्त वाॅट्स ॲपवरच राहू नयेत. त्या प्रत्यक्षात उतरविण्यासाठी समाजातील प्रत्येक स्तराने या साठी काम केले पाहिजे.
पण त्या बरोबर एक गोष्ट अशीही दिसते. लोक आपले प्राॅब्लेम स्वतःशीच ठेवतात. कोणत्याही कारणाने का असेना लोक आपले प्राॅब्लेम अगदी नातेवाईकातही शेअर करताना दिसत नाहीत. आधीच एक अथवा दोन मुले ती ही लांब असतील तर खरतर मनुष्य बळाची गरज असते.
खरंच अशी मदत आपल्याला हवी तेव्हा मिळाली अथवा दुसर्यांसाठी करता आली तर किती चांगले वाटेल नां !!!
खरंच पुण्या प्रमाणे अशी मदत करणारे उपक्रम सगळीकडे सुरू व्हायला हवेतच पण मित्र मैत्रीणी तसेच आपण ज्या सोसायटीत राहतो तिथल्या लोकांनी असे 'मदत' वाॅट्स ॲप गृप तयार करावेत व शक्य तेवढी मदत गरजेनुसार एकमेकांना करावी.
कारण या सगळ्यात एक आपुलकी, प्रेम असेल.
नुसत्या व्यवहारा साठी तर आता अंत्यसंस्कार करणारे ॲप ही उपलब्ध आहे. आधीच पैसे भरून ठेवायचे, ते लोक नंतर येऊन सगळंकाही करतात !!!! त्या ही पुढे जाऊन लोक आता स्वतःचे मरणोत्तर दिवसवारे ही आधीच करून ठेवतात गरूडेश्वराला जाऊन !! आता बोला...
असो... लिखाणातला थोडासा अतिरेक सोडून दिला तरी त्यात तथ्य ही आहेच पण इतके काही वाईट दिवस आले नाहीयेत. आपली मुले बाळे, नातेवाईक, आपण जमवलेले स्वकीय, शेजारी-पाजारी आणि मुख्य म्हणजे आपली मित्र मंडळी आपल्या सोबत आहेत याची नक्कीच खात्री बाळगा. मी स्वतः याचा खूप चांगला अनुभव घेतला आहे. मदत करत रहा... मदत मिळत राहते हे नक्की.
वीणा कुलकर्णी 🙏🙏
Comments
Post a Comment