॥ ईश्वराची दया ॥

   डोळ्यांनी बघतो, ध्वनी परीसतो कानी, पायी पदी चालतो ।

    जिव्हेने रस चाखतो,मधुरही  वाचा मुखी बोलतो ।

    हाताने बहुसाळ काम करतो विश्रांती ही घ्यावया ।

    घेतो झोप सुखे, फिरूनी उठती ही ईश्वराची दया ॥

     या एका श्लोकात त्या ईश्वराची किमया सांगितली आहे. किती त्या जगन्नीयंता बद्दल लिहावे तेवढे कमीच आहे. कारण केवढे ते आश्चर्य आहे, त्या 'अज्ञाता' वर गाढ विश्वास ठेवून आपण गाढ झोपून जातो.. उद्या नक्कीच उठण्यासाठी..

    आणि ही त्याची जादूगारी फक्त माणसांबाबतच नाहीये तर जगातील सर्व प्राणी,पक्षी,वनस्पती इ.इ. सगळ्याच सजीव निर्जीव गोष्टींबाबत आहे. 

     पावश्या पक्षी माहित आहे नां? पाऊस जवळ आला की 'पेरते व्हा' असे ओरडत शेतकऱ्यांना पेरणीचा इशारा देतो. कुठून त्याला हे ज्ञान मिळते की पाऊस लवकरच पडणार आहे. 

      पाऊस जवळ येण्या आधीच सगळ्याच पक्ष्यांची घरटे बांधण्याची घाई उडते. मुंग्यांचा सुळसुळाट होतो, पावसा आधी वारूळात धान्य भरण्यासाठी !!!  

    मारूती चित्तमपल्ली आपल्या पुस्तकात लिहीतात की कावळा आपले घरटे झाडांवर कोणत्या ठिकाणी बांधतो, त्यावरून ही पाऊस किती पडेल याचा अंदाज बांधता येतो. खूप वर शेंड्याजवळ बांधले तर कमी वादळवारे,कमी पाऊस.  मध्यावर मध्यम पाऊस आणि मजबूत बेचक्यात बांधले तर खूप पाऊस!!! 

     कोतवाल पक्षी तर म्हणे नावाप्रमाणेच कोतवाली करतो आणि बाकी पक्ष्यांना घरटी बांधण्यासाठी उत्तम जागा दाखवायला मार्गदर्शन करतो.

    देवाच्या कृपेने निसर्गतःच त्यांना हे ज्ञान असते कारण ते निसर्गाच्या अजून ही जवळ आहेत. माणसांना ही असे ठोकताळे माहित होते. खेड्यांतील लोक अजून ही निसर्गाच्या जवळच आहेत.

   अशा पशुपक्ष्यांच्या निसर्गाच्या जवळीकतेच्या अनेक गोष्टी सांगण्या सारख्या आहेत ज्या निसर्ग महर्षी मारूती चित्तमपल्लींनी आपल्या अनेक पुस्तकात विस्तृत पध्दतीने लिहून ठेवल्यात. 

    त्यांनी लिहीलेल्या काही मजेशीर गोष्टी,

    वाघ झाडा वाटोळा गोल गोल फिरतो. माकड वेड्यासारखी तशी मान फिरवतो आणि चक्कर येवून आयता वाघासमोर पडतो. झालं !! 

      उंदीर तर कमाल करतात, अंडी चोरण्यासाठी एक उंदीर पाठीवर झोपून अंडे  चारही पायां मध्ये पकडून ठेवतो. मग दुसरा उंदीर त्याची शेपूट ओढत बिळात घेऊन जातो आणि अंडे सुखरूप बिळात पोचते. 

     अशा किती गोष्टी सांगाव्यात, 'त्या' परमेशाने प्रत्येकाची रहाण्या, जेवणाची, खाण्यापिण्याची उत्तम सोय करून ठेवली आहे. निसर्गात मनुष्य प्राणी सोडल्यास कोणीही गरजेपेक्षा जास्त साठा करून ठेवत नाही. 

     मनुष्य मात्र निसर्गाला जमेल तसे ओरबाडत आहे का? या वर्षांतला आणि दरवर्षी वाढतच जाणारा अती उन्हाळा त्याचाच परिणाम आहे कां? 

    कारण फक्त एक दिवसच असतो 'जागतिक पर्यावरण दिन', बाकी दिवस आहेच शिमगा!!



वीणा कुलकर्णी 🙏

Comments

Popular posts from this blog

अलीबाबाची गुहा..

लापता लेडीज: माणुसकीचे दर्शन

तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार!!!