Made in India: a TITAN story

    एक अप्रतिम कलाकृती म्हणजे काय याचे उत्तम उदाहरण म्हणजे Prime video/MX Player या OTT चॅनेल वर सुरू असलेली ही मालिका. 

     महनीय जे.आर.डी. टाटांना स्वित्झर्लंड मध्ये ऐकवले गेले की, तुमच्या भारतात चांगली घड्याळे बनणे शक्य नाही.... आणि येथूनच स्फुलींग पेटले आणि सुरू झाला एक अद्भुत प्रवास. त्या वर विनय कामथ या लेखकांनी वरील पुस्तक लिहिले आणि त्याची बनलेली गोष्ट म्हणजे ही एक उत्तम वेब सेरीज. 

     या मालिकेतील प्रत्येक अगदी प्रत्येक कलाकर हा त्या भुमिके साठीच बनला आहे इतके उत्कृष्ट काम प्रत्येकाने केले आहे. कुणा एकाचे कौतुक करावे तर दुसर्‍यांवर अन्याय होईल. प्रत्येक पात्राच्या व्यक्तीरेखेत तुम्ही अक्षरशः गुंतून जाता,इतकी प्रभावी कामे केली आहेत. 

     "टाटा" हे नावच इतके मोठ्ठे, वलयांकित आहे की त्यावर आपण कलाकृती करत आहोत याचे उत्कृष्ट भान निर्मात्या पासून ही मालिका बनवणाऱ्या प्रत्येकाला आहे. आणि ही जाणीव इतकी तीव्र आहे की मालिकेची प्रत्येक फ्रेम केवळ बघत रहावी अशी झाली आहे. अनेकदा आनंदाने शरीरावर रोमांच उभे रहातात तर कधी डोळ्यातून टचकन आनंदाश्रू ओघळतात.  

     अपार देशभक्त "टाटा", या घराण्याबद्दल सगळ्यांनाच आदर व अभिमान आहे. अनेकांनी तर वरील पुस्तक तसेच गिरीश कुबेर लिखित टाटायन नक्कीच वाचली असतील.  

    ही मालिका नुसती बघण्याची नाही तर अनुभवण्याची आहे. एक सुंदर, सुखद अनुभव ही मालिका देते. फक्त सहा भागात असूनही थोडक्यात पण उत्तम गोष्ट सांगते. 

    म्हणून मी सगळ्यांना आग्रहाने सांगेन, Made in India: A Titan story आवर्जून Prime Video/MX Player (completely free to watch) या चॅनेल वर नक्की बघाच. कारण हा सिनेमा जगतातला एक महत्वाचा माईल स्टोन ठरणार आहे, ज्याचे आपण साक्षीदार असेलच पाहिजे.


वीणा कुलकर्णी 🙏



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

अलीबाबाची गुहा..

लापता लेडीज: माणुसकीचे दर्शन

तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार!!!