विन्स्टन चर्चिल
आता आपण, भारत देश स्वतंत्र होऊन पुढच्या वर्षी ऐंशीव्या वर्षांत पदार्पण करणार आहोत. या वर्षांमध्ये आपण सर्वच क्षेत्रात खूपच प्रगती केली आहे, हे आपल्या सर्वांना माहित आहेच आणि त्याचा सार्थ अभिमान ही आहे.
पण सध्या जंतरमंतर वर झालेले युवा पिढीचे निदर्शन, दहीहंडी, गणेशोत्सवातला डीजे चा वापर या घटना मन विषण्ण करतात.
मग चर्चिल चे भारताबद्दल चे मत आठवले, की, भारताला एवढ्यात स्वातंत्र देवू नका. १९४३ मध्ये बंगाल मध्ये तीस लाख माणसे मृत्यूमुखी पडली कारण, चर्चिल आणि त्यांच्या मंत्रीमंडळाने लवकर निर्णय न घेतल्यामुळे भयानक दुष्काळ आला तो आठवला मग त्याना जास्त समजून घेण्यासाठी पुनः एकदा त्यांच्यावर आधारलेला Darkest Hour नावाचा सिनेमा प्राइम व्हिडिओ वर बघितला.
युद्धाचे ढग डोक्यावर घोंघावत असतानाच वयाच्या पासष्ट व्या वर्षी चर्चिल याना इंग्लंड चे पंतप्रधान बनवले गेले.
हिटलर सारखा शत्रू समोर होता. देशहितासाठी कठोर निर्णय घ्यावे लागणार होते. मंत्रीमंडळाचा म्हणावा तसा पाठिंबा नव्हता.
आणि शेवटी ती वेळ आलीच पण चर्चिल यानी खूप विचारपूर्वक कठीण निर्णय घेतला, डंनकिर्क लढाई चा !!
डंनकिर्क... ३००० बळी/ बलिदान आणि त्याच्या बदल्यात तीन लाख सैनिक वाचवले. नंतर चा इतिहास सर्वांनाच माहित आहे. इंग्रजांनी मित्रराष्ट्रां सोबत मिळून हिटलरचा पराभव केला आणि दुसरे महायुद्ध जिंकले.
खरंतर ज्या इंग्रजांनी आपल्याला दिडशे वर्ष भीषण पारतंत्र्यात लोटले होते त्यांच्या बद्दल चकारही चांगले शब्द लिहिण्याची इच्छा नाही.
पण एक गोष्ट मात्र नक्कीच नमूद करावीशी वाटते, ज्या देशाला अनेकानेक अशी खंबीर नेतृत्वे लाभली असतील तर तो देश अजेयच असणार. उगाच नाही म्हणत की एका काळी सगळ्या जगभर त्यांची सत्ता होती त्यामुळेच त्यांच्या साम्राज्यावरचा सूर्य कधी मावळत नव्हता.
विन्स्टन चर्चिल चेच एक प्रसिद्ध वाक्य आहे जे त्यांचा लढाऊ स्वभावच दाखवून देते...
Success is not final; failure is not fatal.
It is the courage to continue that counts.
वीणा कुलकर्णी 🙏🙏
Comments
Post a Comment