बोलणे

आपले वय वाढू लागल्यावर आपण जरा जास्तच बोलू लागतो का ? की वाॅट्स ॲप युनिव्हर्सिटीने सांगितले की बोलत रहा, मनात काही ठेवू नका...म्हणून बोलतो आपण.

असो,तर माझा तरी अनुभव आहे मी खरंच जरा जास्तच बोलू लागले आहे अगदी समोरच्याला बोलू न देता, त्याचे बोलणे न ऐकता !!!

नाही, हे अजिबात खरे नाहीये…मी जरा मजा केली. तब्बल बत्तीस वर्षे पब्लिक सर्वंट म्हणून काम केल्यावर काय हिंमत आहे,समोरच्याचे न ऐकण्याची !!

या संदर्भात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची माणसे भेटत असतात. काही अबोल तर काही बोलकी तर काही अती बडबडी. 

काहीजण असे असतात, तुमचे बोलणे मनापासून ऐकतात. तुम्हाला अजून जास्त बोलायला उद्युक्त करतात. तुमच्या बोलण्यात रस दाखवतात, तुमच्या सुख-दुःखावर चर्चा करतात.

तर काही महाभाग तुम्हाला बोलूच देत नाहीत. स्वतःचेच घोडे पुढे दामटत राहतात.

तर काही असेही असतात त्यांचे तुमच्या बोलण्याकडे लक्षच नसते तर काही अती भोचक असतात. काही टोचून बोलतात तर काही माहिती काढून घेतात आणि उलटीच पसरवतात. असो.

तर असे माणसांचे विविध नमुने आपल्याला भेटत असतात. त्यातून आपल्याला खूप शिकता येते. कुठे, कधी, कसे व केवढे बोलायचे याची अनुभवाअंती समज येऊ लागते आणि ती खूपच गरजेची असते. 

माणसे ओळखण्यात आपण अनेक वेळेस नव्हेतर बहुतांशी चुकतोच. पण बोलताना समोरच्याचा अंदाज घेऊन किती बोलायचे हे अनुभवाने समजून घेण्याची सवय केली पाहिजे हे खूप महत्त्वाचे आहे असे मला मनापासून वाटते. आणि आपण वरील पैकी कोणत्या कॅटगरीत मोडतो हे समजून घ्यायला हवे आणि काही चुकत असेल तर योग्य ती सुधारणा करण्याचा प्रयत्न नक्कीच केला पाहिजे. 

रामकृष्ण हरी 🙏🙏


वीणा कुलकर्णी

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

अलीबाबाची गुहा..

इंटरनेट उपवास

लापता लेडीज: माणुसकीचे दर्शन