अशीच एक गोष्ट
ती सुंदर राजकन्या आणि बेडूक झालेल्या शापित राजपुत्राची गोष्ट आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे.
माझी गोष्ट थोडी वेगळीच आहे. छान, गंमतशीर अजिबात नाहीये.
तर आपली ही नवीन राजकन्या अशीच फेरफटका मारत बागेत फिरत असते. तेवढ्यात तिला एक चांगला जाडा,काळपट हिरवा बेडूक तलावाकाठी बसलेला दिसतो. ती त्याच्याकडे जाऊ लागते......
तिला जवळ येताना बघून तो मनोमन खूप खुश होतो.....
आता ती येणार,आपल्याला उचलणार आणि आपले तिच्या सुंदर ओठांनी चुंबन घेताच आपण शापमुक्त होऊ आणि नंतर तिच्याजवळ विवाह करून आपल्या राज्यात राज्य करू....
ती येते,त्याला उचलते आणि स्वतःजवळच्या पिशवीत ठेवते. मग ती घरी येते त्या बेडकाला स्वच्छ धुते, निगुतीने सगळीकडून त्याला छान कापते व त्याच्या मांड्यांचा चमचमीत रस्सा करून चाटून पुसून खाते....
संपली गोष्ट....
मलाही लिहीताना खूप वाईट वाटले पण साधारण पस्तीस चाळीस वर्षांपूर्वी हा व्यवसाय खूप भरभराटीला आला होता. आताही असेल तर मला माहीत नाही.
बेडकांच्या मांड्या चीनला पाठवल्या जात असत. ती त्यांची फेवरेट डिश होती म्हणे !!!!
माणूस स्वतःच्या फायद्यासाठी निसर्गाच्या साखळीतच ढवळाढवळ करत असतो कारण शेतकऱ्यांचा मित्र साप...त्याचे हे बेडूक, उंदीर हे मुख्य भक्ष असते. पण बेडकांच्या शिकारी मुळे निसर्गचक्रात बाधा येते.
तसे या सगळ्यात वाईट वाटून घेण्या व्यतिरिक्त आपण काय करू शकतो म्हणा !!!!
तरी एक बरे आहे, हल्ली म्हणे शाळा, कॉलेजात शिकण्यासाठी बेडकांचे डिसेक्शन थांबवले आहे.
वीणा कुलकर्णी 🙏🙏
Comments
Post a Comment