कबुतर

    माझ्या मुलीने कबुतरा बद्दल एक गोष्ट सांगितली आणि मला ती खूपच पटली. कबुतरा बद्दल खूप वाईट ही वाटले.

    माणसाने सुमारे ५ ते १० हजार वर्षांपूर्वी आपल्या कामासाठी कबुतराला माणसाळवले. गुगलबाबा सांगतो याची सुरुवात मेसोपेटोमिया येथून झाली. माणसाळवलेला तो सर्वात पहिला पक्षी आहे. मग ती रानावनात न रहाता, माणसांनी बनवून दिलेल्या घरात म्हणजेच खुराडी, पिंजरे अशाच ठिकाणी राहू लागली. माणसे त्यांच्याकडून काम करून घेण्यासाठी त्यांची काळजी ही घेत होती व खायला प्यायला ही देत होती. 

      हळूहळू दळणवळणाची नवनवीन साधने उपलब्ध झाली आणि कबुतरांची गरज संपली. माणसांनी त्यांना अक्षरशः वाऱ्यावर सोडले. मग ती घरांच्या आडोशाला वगैरे राहू लागली. वर्षांनुवर्षांच्या गुलामगिरीमुळे ती झाडांवर घरटी बांधणे विसरूनच गेली होती. अशातच माणसांनीच त्यांच्यासाठी कबुतरखाने बनवले आणि त्यांच्या रहाण्याची, खाण्या-पिण्याची सोय केली. तशीही माणसांजवळ रहाण्याची सवय असल्यामुळे ,ती माणसांच्या आसपासच घुटमळत राहिली. 

    वाढत्या प्रदुषणात, कबुतरांमुळेही श्वसनविकार होतात याचा शोध लागला आणि तो खराही ठरला. मग कबुतरखाने हटवणे माणसांनी सुरू केले. मग ती अजूनच सैरभैर झाली. त्यांना खरंच कळत नाहीये कुठे जावे कारण जंगल तर त्यांच्या आयुष्यातून हजारो वर्षांपूर्वीच नाहीसे झालेय. 

    खरंच विचार केला की कबुतरां बद्दल वाईट वाटते.

    विचार करा माणसांनी अचानक ठरवले की कोंबड्या खायच्या नाहीत आणि त्यांना मुक्त केले तर कुठे जातील त्या?? कबुतरां सारखीच सैरभैर अवस्था होईल त्यांचीही!!

       खरंतर कबुतराच्या मानेवरची रंगीत पिसे किती सुंदर असतात एखाद्या मोरपिसा सारखी पण श्वसनविकाराच्या भितीने त्याला लांबच ठेवणे उत्तम. 

     Pretty Privilege नावाची एक संकल्पना आहे. नुसते सुंदर व्यक्तिमत्त्व असले तरी सहजतेने आपोआप काही फायदे मिळतात.  

     तसेच बिचाऱ्या पक्षां संदर्भात ही आहे. घरातील पाळीव कोंबडीला सहज कापले जाते मात्र पोपटाला किंवा मोराला प्रिटी प्रिव्हीलेज मिळतो. असो. जगाची रीतच आहे ती... 

    पण चकाकते ते सर्व सोने नसते ही खूणगाठ मनाशी बांधून ठेवायची.

राम कृष्ण हरी.


वीणा कुलकर्णी 🙏

Comments

Popular posts from this blog

अलीबाबाची गुहा..

लापता लेडीज: माणुसकीचे दर्शन

तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार!!!