स्विकार

    माननीय डॉक्टर आनंद नाडकर्णी आपल्या 'स्वभाव विभाव' पुस्तकात म्हणतात,  

जे टाळणे अशक्य, दे शक्ती ते सहाया

जे शक्य साध्य आहे,निर्धार दे कराया

मज काय शक्य आहे, आहे अशक्य काय ? 

माझे मला कळाया,दे बुद्धी देवराया  !!

     थोडक्यात काय आयुष्यात जे बदलता येत नाही ते स्वीकारायचे आणि जे करता येईल ते चांगल्या पध्दतीने करत राहायचे तरच जीवन सुसह्य होईल. 

      खरंच किती सत्य आहे पण आपण ते तसे आचरणात आणतो का हे प्रत्येकाने स्वतःशीच पडताळून पहायला हवे.

      आता हेच बघा ना वय वाढणे हा नैसर्गिक नियम आहे. शरीरात वयानुसार छोटे-मोठे बदल होतच असतात,ते तसेच आपल्याला स्विकारावेच लागतात. अर्थात वय वाढले तरी मनाने तरुणच रहाण्याचा प्रयत्न करणे मात्र आपल्याच हातात असते. तरीही जर आपण आपल्या वाढत्या वयाचा ग्रेसफुली स्विकार केला तर आयुष्य आणखीनच सुंदर होवू शकते. 

      कारण माझ्या माहितीत एक काकू आहेत, डोळ्यांवर केमिकल चा वाईट परिणाम होत असून ही त्या केस काळे करणे थांबवत नाहीयेत. दुसर्‍या आहेत त्यांचे कुठल्याच कामाला येणाऱ्या बाई बरोबर पटत नाही मग होत नाही तरी आणि आर्थिकदृष्ट्या परवडत असून ही स्वतःच धडपडून कामे करत असतात आणि आजारी पडतात. असेच एक काका एका मोठ्या आजारातून उठलेत पण आपल्याला विश्रांतीची गरज आहे हे मान्यच नाही. फिरत असतात मग परत आजारी पडतात.

      वयानुसार येणारी बंधने दिलखुलासपणे मान्य करावीत, झेपेल तितकेच फिरावे, योग्य तेवढी मजा करावी तर आयुष्य खूप सुंदर आहे. तरुण रहाण्याचा अट्टाहास कशाला करायचा ? मनाने तरुण राहूनही जीवनाची खूप मजा घेता येऊ शकतेच की ! 

ज्येष्ठतेचा मनापासून स्विकार करा बघा जीवन किती सुंदर आहे ते...

      थोडक्यात काय आलेल्या परिस्थितीचा आनंदाने स्विकार करा. हसत,मजेत जगा. झेपेल, पचेल तेवढेच खा, प्या,आणि हो व्यायामही करा. नातवंडांशी मनसोक्त खेळा. जमेल तेवढी घरात मदत करा. बघा पुनः सांगते जीवन सुंदर आहे.

     मुख्य म्हणजे कसलीही तक्रार करायची नाही,सगळे आनंदाने स्विकारायचे.



वीणा कुलकर्णी 🙏🙏

Comments

Popular posts from this blog

अलीबाबाची गुहा..

इंटरनेट उपवास

लापता लेडीज: माणुसकीचे दर्शन